AV FISTULA

हे ऑपरेशन Artery (शुद्ध रक्तवाहिनी) आणि Vein (अशुद्ध रक्तवाहिनी ह्यांना सुक्ष्मशस्त्रक्रीयेने (miscrosurgery) जोडण्याची एक शस्त्रक्रीया आहे.
हे ऑपरेशन कशासाठी करायचे ?
ज्या पेशंटला डायलिसिसची गरज पडते त्यांना हातामध्ये वेगाने रक्तप्रवाह असणाऱ्या नसा (Veins) तयार करण्यासाठी हे ऑपरेशन करावे लागते. डायलिसिससाठी नसेमध्ये जोरात रक्तप्रवाह असणे आवश्यक असते. तेवढा वेगवान प्रवाह हातातल्या नसांमध्ये कृत्रिमरित्या निर्माण करण्यासाठी हे ऑपरेशन करतात.
हे ऑपरेशन केव्हा करावे ?
१) डायलिसिसची गरज पडेल अशी शक्यता वाटल्यावर
२) हाताच्या नसा इंजेक्शन / सलाईन देऊन खराब होण्याच्या आधी.
३) पेशंटची कंडीशन चांगली असताना ऑपरेशन करणे उत्तम. त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
४) ज्या पेशंटचे डायलिसिस सुरु आहे अशांनी डायलिसिसच्या २ या दिवशी ऑपरेशन करावे. किडनी फेल्युअरचे निदान झाल्यावर लगेच हे ऑपरेशन करणे फार चांगले असते.
या ऑपरेशन नंतर ५-६ दिवस डायलिसिस का करू नये ?
डायलिसिस मध्ये रक्त न गोठण्यासाठी Heparin नावाचे इंजेक्शन वापरले जाते. AV Fistula ऑपरेशनचे रक्तवाहिन्या वरील टाके मजबुत होण्याच्या आधी Heparin देणे योग्य नसते. त्यामुळे कधी कधी भयंकर रक्तस्त्राव होऊ शकतो. म्हणुन ऑपरेशन नंतर जांघेतल्या किंवा गळ्यातल्या नळीतून ही ५ ते ६ दिवस डायलिसिस देणे योग्य नाही.
हे ऑपरेशन नेहमीच यशस्वी होते का ?
नाही. ज्या पेशंटच्या रक्तवाहिन्या पुरेशा जाड व उत्तम स्थितीत असतात, रक्तप्रवाहाचा वेग योग्य असतो व रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती नॉर्मल असते. अशा पेशंटमध्ये हे ऑपरेशन यशस्वी होण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असते.
हे ऑपरेशन यशस्वी झाले हे कसे कळते ?
वेगाने वाहणाऱ्या रक्ताचा प्रवाह नसेवर हलकेच बोटे ठेवले असता जाणवतो. त्याला Bruit ब्रुई असे म्हणतात. ही वारंवार तपासवी.
या ऑपरेशन नंतर कोणती काळजी घ्यावी ?
१) रक्तदाब नॉर्मल असावा. अति उच्च रक्तदाब झाल्यास फिस्टुलातुन भयंकर रक्तस्त्राव होवू शकतो.
२) हात वर ठेवावा.
३) हातातील रक्त प्रवाहास बाधा येईल अशा गोष्टी टाळाव्या. उदा. त्या हातात ब्लड प्रेशर तपासणे, त्या कडेवर झोपणे. डोक्याखाली हात घेणे.
४) मूठ बंद उघड करण्याचा व्यायाम करावा.
५) फिस्टुला झालेल्या पेशंटनी लांब बाह्याचा शर्ट घालू नये. घट्ट कपडे घालू नये.
ऑपरेशन यशस्वी झाल्यास फिस्टुला मधुन डायलिसिस कधी करावे ?
तीन आठवड्यात नसा फुगून पुरेशा जाड होतात. नंतर डायलिसिस साठी फिस्टुला वापरणे योग्य असते.
एकदा यशस्वी झालेला फिस्टुला नेहमीच डायलिसिस साठी काम देईल का ?
१) फिस्टुला यशस्वी झाला व ब्रुई लागत असली तरी काही पेशंटच्या नसा लवकर फुगत नाहीत ( विशेषतः स्त्री रुग्णांच्या) व डायलिसिसच्या वेळी सुया टोचणे अवघड जाते.
२) कधी कधी डायलिसिससाठी वापरलेली नस बंद होते (Thrombophlebitis).
३) कधी कधी रक्ताची गुठळी बनुन सुरु असलेला फिस्टुला बंद पडतो. ब्रुई लागणे बंद होते.. मधुमेहाच्या रुग्णामध्ये याची शक्यता जास्त राहते. काही फिस्टुला जन्मभर काम देतात तर काही थोड्या कालावधीतच बंद पडतात.
४) एखाद्या रुग्णाच्या फिस्टुलातुन फारच वेगाने रक्तप्रवाह असल्यास नसा अति प्रमाणात फुगतात.
५) वाढलेल्या रक्तप्रवाहचा ताण सहन न होवून एखाद्या वेळी रक्तवाहिनीचा फुगा बनतो व फुटण्याची शक्यता निर्माण होते. हे फारच क्वचित होते.